पिवळ्या फुलांचा
शानदार सडा
अलवार सुखाचा
भरतोय घडा
उन्हाळ्याच्या तापाचा
पाडतो विसर
सुवर्णसौंदर्याने
दिपते नजर
मंद सुगंध
पसरतो हवेत
छोटीशी झुळूक
घेऊन कवेत
मध्येच येते
कोकीळेची साद
कानात घुमतो
मंजुळ नाद
कोवळी पालवी
चैत्र चाहूल
हळूच घालते
मनाला भूल
जिभेवर रेंगाळते
कैरीची चव
असाच चालू दे
वसंतोत्सव
Comments